अकोला - गत ३० ते ४० वर्षांपुर्वी गुन्हे केलेल्या आणि फरार असलेल्या आरोपींच्या शोधासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर व अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनात पथक कार्यान्वीत करण्यात आले असून या पथकाने सोमवारी ३१ वर्षांपासून फरार असलेल्या आणि गत ८ वर्षांपासून फरार असलेल्या अशा दोन आरोपींना अटक केली.बुलडाणा जिल्हयातील मेहकर येथील अनसिंह परिसरातील रहिवासी विष्णु देमाजी राउत (६०) याने १९८८ मध्ये सिटी कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाची फसवणुक केली होती. त्यामूळे सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात राउत याच्याविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम ४०६ नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सदर आरोपी फरार झाला असून पोलिसांना त्याचा शोध लागला नाही. सदर आरोपी पुसद वाशिम रोडवरील मुंगसाजी ढाबा येथे कामावर असल्याची माहिती स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर या पथकाने सदर आरोपीस अटक केली. त्यानंतर आरोपीस सिटी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर दुसरी घटना बार्शिटाकळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत २०११ मध्ये घडली होती. या घटनेत जबरी चोरी करून चोरटा पसार झाला होता. मात्र सदर पथकाला माहिती मिळताच बाळापूर तालुक्यातील कासारखेडा येथील रहिवासी शेख अनीस शेख अफजल याला बाळापूर शहरातून अटक करण्यात आली. त्यानंतर सदर आरोपीस बाळापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर पथकाने आतापर्यंत १०० वर आरोपींना अटक केल्याची माहिती आहे.
३१ वर्षांपासून फरार असलेला आरोपी अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 3:30 PM