मूर्तिजापूर : ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्या सांगवामेळ येथील आरोपी खुनाच्या गुन्ह्यात अमरावती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना ३१ ऑगस्ट रोजी पळाला होता. या आरोपीस ग्रामीण पोलिसांनी ११ सप्टेंबर रोजी शिताफीने अटक करून फ्रेजरपुरा पोलिसांच्या स्वाधीन केले.
सांगवामेळ येथील संतोष श्रीराम सोळंके (३०) हा ३० जून २०१४ पासून अमरावती येथील खुल्या कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना तो ३१ ऑगस्ट २०२१ रोजी कारागृहातून पळून गेला होता. यासंदर्भात तुरुंग रक्षक नारायण रामचंद्र चवरे यांनी फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन अमरावती येथे तक्रार दाखल केली होती. कारागृहातून पळून आलेला आरोपी सांगवामेळ येथे असल्याची माहिती मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांना मिळाली असता, सापळा रचून मोठ्या शिताफीने त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई ठाणेदार गोविंद पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली हेकॉ सुभाष उघडे, हेड कॉन्स्टेबल संजय शिंगणे, हेड कॉन्स्टेबल संजय खंडारे, पोलीस शिपाई गजानन सयाम, चालक संतोष कमलाकर, होमगार्ड सैनिक नितीन भगत, नीलेश दहीकर यांनी पार पाडली. कारवाई करून सदर आरोपीस फ्रेजरपुरा पोलिसांच्या सुपूर्द केले.