अकोला: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला पळवून नेणाºया आरोपीला तीन वर्षांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले. आरोपीला जुने शहर पोलिसांनी ठाणे येथील स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या स्वाधीन केले.ठाणे जिल्ह्यातील कश्मिरा पोलीस ठाण्यांतर्गत १७ जुलै २०१६ रोजी दिलेल्या आई-वडिलांच्या तक्रारीनुसार त्यांची १५ वर्षीय मुलगी झाली होती. अज्ञात आरोपीने तिला पळवून नेल्यामुळे पोलिसांनी कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आल्यानंतर पोलिसांना आरोपी नितीन कृष्णा गवई हा मुलीला घेऊन वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील कोढोली येथे असल्याची माहिती मिळाली. त्याचा तपास घेण्यासाठी शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने आणि महिला पोलीस कर्मचारी सपना थोरात हे मानोरा येथे पोहोचले; परंतु तो तिथे आढळून आला नाही. अधिक चौकशी केली असता, नितीन गवई हा अकोल्यात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. जुने शहरचे ठाणेदार अन्वर शेख यांना याबाबत माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी आरोपी व मुलीचा शोध घेतला आणि प्रकरण आरोपी नितीन कृष्णा गवई यास राजंदा येथून तर मुलीला शिवसेना वसाहतीतून ताब्यात घेण्यात आले. आरोपीला ठाणे स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले, तर मुलीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. (प्रतिनिधी)