अकोला : दीड वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणारा आरोपी प्रशांत ऊर्फ गुड्डू शंकर इंगळे याला प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.आय. आयरलँड यांच्या न्यायालयाने गुरुवारी आजन्म कारावास आणि पाच लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम ही पीडितेला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला.पीडित चिमुकलीच्या आईच्या तक्रारीनुसार तिचा पती ८ फेब्रुवारी २0१३ रोजी रात्री बाजारात गेला होता. दरम्यान, तिच्या घरी आरोपी प्रशांत ऊर्फ गुड्डू शंकर इंगळे हा आला. आरोपी घराबाहेर जायला तयार नसल्यामुळे पीडितेची आई मदत मागण्यासाटी शेजारी राहत असलेल्या जाऊच्या घरी गेली. ती परत आल्यावर तिला नराधम आरोपी प्रशांत इंगळे हा दीड वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसले. तिने त्याला हटकल्यावर त्याने त्या महिलेचाही विनयभंग केला. महिलेने आरडाओरड केल्यामुळे नागरिक गोळा झाले. नागरिक गोळा झाल्याचे पाहून आरोपी प्रशांत इंगळे याने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणात मूर्तिजापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३५४, ४४८, ४५०, ३२३, ३७६, ५११ सह कलम पोस्को ७, ८ नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासले. न्यायालयात आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने, त्याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ञ मंगला पांडे यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)न्यायालयाने अशी सुनावली शिक्षा!आरोपी प्रशांत ऊर्फ गुड्डू शंकर इंगळे याला दोषी ठरवित प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.आय. आयरलँड यांनी कलम ३५४ नुसार पाच वर्षे कारावासासह पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त कारावास, कलम ४४८ नुसार एका वर्षाचा कारावास, एक हजार रुपये दंड, न भरल्यास एका महिन्याचा अतिरिक्त कारावास, कलम ४५० नुसार दहा वर्षांचा सश्रम कारावास, दहा हजार दंड, न भरल्यास एका वर्षाचा अतिरिक्त कारावास आणि कलम ३७६ नुसार सह कलम पोस्को ३ आणि ४ मध्ये आजीवन कारावास, ५० हजार रुपये दंड, न भरल्यास एका वर्षाचा अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. या सर्व शिक्षा एकाच वेळी भोगाव्या लागणार आहेत.