अकोला, दि. १0- तेल्हारा तालुक्यातील अथर्व बरिंगे हत्याकांड प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेल्या सात आरोपींची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निर्दोष मुक्तता केली. अकोट येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात सदर आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते, यावरून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सातही आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडले.तेल्हारा तालुक्यातील व्यापारी मधुसूदन बरिंगे यांचा मुलगा अथर्व बरिंगे याचे पाच हजार रुपयांच्या मागणीसाठी २७ डिसेंबर २0१0 रोजी अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर अथर्वची हत्यासुद्धा करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी वडगाव रोठे येथील रहिवासी रमेश हिरामण वानखडे, सिद्धार्थ भगवान वानखडे, राहुल दादाराव वानखडे, नागेश लक्ष्मण वानखडे, विक्रम सदाशिव वानखडे, परमेश्वर सिद्धार्थ वानखडे व महेंद्र वामन वानखडे यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस तपासानंतर अकोट येथील सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. अकोट येथील अतिरिक्त न्यायाधीशांनी सातही आरोपींना विविध कलमान्वये जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती; परंतु आरोपींनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाद मागितली. दरम्यान, नागपूर खंडपीठाच्या न्यायाधीशांनी सातही आरोपींना सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडले आहे.
बारिगे हत्याकांड प्रकरणात जन्मठेपेचे आरोपी निर्दोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2017 2:46 AM