पोस्को कायद्यान्वये ठोठावली शिक्षा, 10 हजार रुपयांचा दंडही ठोठावला
अकोला : उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाळोदी या गावातील रहिवासी एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने बुधवारी पोस्को कायद्यान्वये चार वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच विनयभंग प्रकरणात दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. आरोपीला दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
पाळोदी या गावातील रहिवासी 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी म्हशीला पाणी पाजण्यासाठी गेली असता पाठीमागून बंटी ऊर्फ रामराव रामकृष्ण वक्ते हा आरोपी आला आणि त्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. या प्रकरणाची तक्रार मुलीने उरळ पोलीस ठाण्यात केल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंडविधानाच्या कलम ३५४ अ, पोस्को कायद्याच्या कलम ८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर या प्रकरणाचा तपास उरळ पोलिसांनी करून दोषारोपपत्र जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांच्या न्यायालयात दाखल केले. या खटल्याची सुनावणी बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयात झाल्यानंतर या प्रकरणातील आरोपी बंटी ऊर्फ रामराव रामकृष्ण वक्ते यास भारतीय दंडविधानाच्या कलम ३५४ अ अन्वये दोन वर्षांची शिक्षा, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिन्याच्या अतिरिक्त कारावासाच्या शिक्षेचे प्रावधान केले आहे, तर पोस्को कायद्याच्या कलम ८ अनव्ये चार वर्षांची शिक्षा, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याप्रकरणी सरकारच्या वतीने ॲड. राजेश अकोटकर यांनी काम पाहिले.