अकोला : बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या कान्हेरी सरप येथील ९ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस पोस्कोच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर यांच्या न्यायालयाने सोमवारी तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच १२ हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला असून दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिन्यांच्या शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.
कान्हेरी सरप येथील रहिवासी ९ वर्षीय पीडित मुलगी व तिचा भाऊ घरासमोर खेळत होते. या दोघांची आई शेतात कामासाठी गेली असता आरोपी गोपाल गजानन चोरीपगार (वय २१, राहणार कान्हेरी सरप) हा १२ एप्रिल २०१९ रोजी घराजवळ येऊन तिच्या भावाला मारहाण केली. त्यानंतर अल्पवयीन मुलीला घरामध्ये नेऊन तिचा विनयभंग केला. मुलीच्या भावाने प्रतिकार केला असता त्याला घराबाहेर ढकलून दिले. त्यामुळे अल्पवयीन मुलीच्या लहान भावाने शेजारी धाव घेऊन मोबाईलवरून आईसोबत संपर्क करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्याच्या आईने तातडीने घर गाठले आणि मुलीला घेऊन बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणात बार्शीटाकळी पोलिसांनी आरोपी गोपाल गजानन चोरीपगार याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४, ४५२ आणि पोस्को कायद्याच्या कलम ७, ८, ११, १२, नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास ज्ञानेश्वर चव्हाण यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर यांच्या न्यायालयाने या प्रकरणात सरकार पक्षातर्फे ९ साक्षीदार तपासले. यामधील एकही साक्षीदार फितूर झाला नाही. सरकार पक्षाच्या वतीने ॲड. मंगला पांडे यांनी कामकाज पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणून प्रवीण पाटील यांनी कामकाज पाहिले. या खटल्याची सुनावणी झाल्यानंतर पोस्कोच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर यांनी आरोपीला सर्व कलमान्वये दोषी ठरवित सोमवारी शिक्षा सुनावली. एकूण १२ हजार रुपये दंड न्यायालयाने आरोपीला ठोठावला असून त्यामधील ६ हजार रुपये पीडितेला देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मंगला पांडे यांनी कामकाज पाहिले.
या कलमान्वये ठोठावली शिक्षा
त्यानुसार भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ अन्वये तीन वर्षांचा कारावास ३ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त ३ महिन्यांच्या शिक्षेचे प्रावधान, ४५२ अन्वये तीन वर्षांचा कारावास ३ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त ३ महिन्यांच्या शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे. तर पोस्को कायद्याच्या कलम ७, ८ अन्वये तीन वर्षांचा कारावास ३ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त ३ महिन्यांच्या शिक्षेचे प्रावधान केले आहे. पोस्को कायद्याच्या कलम ११, १२ अन्वये तीन वर्षांची शिक्षा ३ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास अतिरिक्त ३ महिन्यांच्या कारावासाचे प्रावधान न्यायालयाने केले आहे. या सर्व शिक्षा आरोपीला सोबत भोगाव्या लागणार आहेत.