अकोला : सिव्हील लाईन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोठी उमरी येथील रहिवासी गोपाल सुनील शिंदे यांची चाकूने भोसकून हत्या करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक करून शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या हत्याकांड प्रकरणात दोन विधिसंघर्षग्रस्त बालक असल्याने त्यांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
मृत गोपाल सुनील शिंदे (२४) हा मोठी उमरी भागातील गायत्रीनगर स्थित भुईभार लेआऊट परिसरातील रहिवासी होता. प्रेम पांडे व शुभम जगदाडेसह इतर दोन अल्पवयीन मुलांसोबत गोपालचा जुना वाद होता. दरम्यान, गुरुवारी दुपारच्या सुमारास गोपाल हा त्याच्या घरी जेवण करत असताना मारेकऱ्यांनी मृत गोपाल सुनील शिंदे याला फोन करून टिळक राष्ट्रीय शाळेच्या मैदानावर बोलावले. गोपाल तेथे पोहोचल्यानंतर त्यांच्यात शाब्दिक वाद झाले. यानंतर मारेकऱ्यांनी गोपालच्या पोटात आणि पाठीत चाकू भोसकला तसेच दगडाने हल्ला केला. हल्ल्यात गोपाल गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याचे ठाणेदार भानुप्रताप मडावीसह स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने तपास सुरू करत या प्रकरणातील चार आरोपींना अटक केली. मात्र, यामधील दोघेजण अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे तर दोन आरोपींना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.