तालुक्यातील ताकवाडा येथील सौरभ रामदास नवघरे हे दुचाकीने जात असताना अचानक दुचाकी घसरुन त्यांचा अपघात झाला. जखमी अवस्थेत त्यांना एका अनोळखी व्यक्तीने उपचारासाठी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले, परंतु पायाला गंभीर दुखापत आल्याने डॉक्टरांनी सौरभ नवघरे यांना एक्स-रे काढण्याचा सल्ला दिला. त्यामुळे सौरभ नवघरे यांनी आपली पॅन्ट काढून त्या अनोळखी व्यक्तीच्या हातात दिली, परंतु त्या अनोळखी व्यक्तीने पॅन्टच्या खिशात असलेले नऊ हजार रुपये काढून रुग्णालयातून पोबारा केला. या आशयाची फिर्याद सौरभ नवघरे यांनी २२ जानेवारी रोजी शहर पोलिसांत दाखल केली होती. फिर्यादीवरून पोलिसांनी तपास चक्रे फिरवून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेत मुंबई येथून ९ फेब्रुवारी रोजी आरोपी अजय ऊर्फ काल्या रमेश गावंडे (२२) (रा.अण्णाभाऊ साठे नगर स्टेशन विभाग मूर्तिजापूर) अटक केली. चोरलेल्या रकमेतील ५ हजार रुपये त्याच्याकडून पोलिसांनी हस्तगत केली आहे. ही कारवाई ठाणेदार सचिन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली नायक पोलीस शिपाई संजय वाघ, पोलीस शिपाई आकाश वाघमारे, सर्वेश कांबे, सचिन घनबहादूर यांनी केली.
मदतीचा बहाणा करुन रक्कम चोरणाऱ्या आरोपीस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 4:20 AM