अकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेहरू पार्क चौकात एका ३२ वर्षीय युवकाची हत्या करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक करून सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीस दहा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
खदान परिसरातील शासकीय गोदाम मागे रहिवासी असलेले श्याम शंकर घोडे यांची उत्तर प्रदेशातील रामपूर येथील रहिवासी सुमितकुमार राजेशकुमार शर्मा याने शनिवारी मध्यरात्री दगडाने ठेचून हत्या केली. या दोघांनी सोबतच नशा केल्यानंतर नशेतच शर्मा याने घोडे याच्या डोक्यावर दगड टाकला. यामध्ये घोडे यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. त्यानंतर आरोपी शर्मा हा घटनास्थळावरून फरार झाला. मात्र पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून त्यास घटनेनंतर ८ तासाच्या आताच अटक केली. आरोपी सुमितकुमार शर्मा यास अटक करून सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला दहा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास खदानचे ठाणेदार डी. सी. खंडेराव करीत आहेत.