अकोला : मुर्तिजापूर तालुक्यातील धोत्रा शिंदे येथील एका महिलेची ऑटोरिक्षामध्येच धारधार शस्त्रांनी हत्या करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील एम पाटील यांच्या न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच आरोपीस दहा हजारांचा दंड ठोठावला असून दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे. मुर्तीजापुर तालुक्यातील धोत्रा शिंदे येथील रहिवासी आरोपी धनराज प्रल्हाद साठे याने याच गावातील रहिवासी असलेल्या सविता अंकुश दुधे या महिलेला लग्न करण्यासाठी तगादा लावला. मात्र महिलेला त्याच्याशी लग्न करावयाचे नसल्याने महिलेने त्याला स्पष्ट नकार दिला. त्यानंतरही आरोपीने वारंवार लग्नासाठी मागणी केली मात्र महिलेला दोन लहान मुलं असल्याने तिने स्पष्ट नकार दिला.
त्यानंतर १८ मार्च २०९१ रोजी महिला तिचे दोन मुले आरोपी व आटो चालक मुर्तीजापुर वरून धोत्रा शिंदे येथे परत येत असताना आरोपी धनराज प्रल्हाद साठे याने महिला सविता अंकुश दुधे ही ऑटेतून उतरत असतानाच तिच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. या प्रकरणाची माहिती मिळताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सविता दुधे यांचा भाऊ किशोर दुधे यांच्या तक्रारीवरून आरोपी धनराज प्रल्हाद साठे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मडावी यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. तिसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील पाटील यांच्या न्यायालयाने नऊ साक्षीदार तपासल्यानंतर समोर आलेल्या ठोस साक्षी पुराव्यांच्या आधारे आरोपी दशरथ प्रल्हाद साठे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणांमध्ये सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी विधीज्ञ ऍड आनंद गोदे यांनी कामकाज पाहिले. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून ठाकरे, सीएमएस अधिकारी म्हणून श्रीकृष्ण पाचपोर यांनी कामकाज पाहिले.