अकोला : अकोला महापालिका प्रशासनापुढे मार्च अखेरपर्यंत ७३ कोटी वसुलीचे उद्दिष्ट असून, दोन महिन्यांत ते कसे पूर्ण होईल, या चिंतेत महापालिका कर्मचारी आहेत. १०३ कोटींच्या थकीत वसुलीपैकी केवळ ३० कोटी रुपये वसूल करण्यात मनपा प्रशासनाला यश आले आहे. त्यामुळे दोन महिन्यांत ही आकडेवारी कितीवर पोहोचते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, २१ डिसेंबरपासून २० जानेवारीपर्यंत महापालिकेने शास्ती अभय योजना राबविली. या योजनेचा रविवारी शेवटचा दिवस असल्याने महापालिकेचा कर विभाग चारही झोनमध्ये सुरू राहणार आहे.अकोला महानगरातील नागरिकांकडे करापोटी १०३,८२,२९,३८७ थकीत आहे. या वसुलीसाठी महापालिकेचा कर विभाग सातत्याने परिश्रम घेत आहे. अकोला पूर्व झोनने ४२.९६ टक्के, पश्चिम झोनने २०.४९ टक्के, उत्तर झोनने २१.१५ टक्के, दक्षिण झोनने २७.९४ टक्के कर वसुली केली. चारही झोनची एकूण रक्कम ३०,०१,६५,४३४ वसूल झाली आहे. आता महापालिका प्रशासनाला ७३,८०,६३,९५३ रुपयांचा कर मार्च अखेरपर्यंत वसूल करायचा आहे. महापालिका कर विभागाची टीम आता कर वसुलीसाठी मोहीम उघडत आहे. जानेवारी महिना पूर्णपणे प्रशासनाच्या हातून गेल्याने आता दोन महिन्यांच्या वसुलीवर लक्ष कें द्रित झाले आहे.*शास्ती अभय योजनेचा शेवटचा दिवसमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या करधन नियम ८ कलम ५१ अन्वये शास्ती माफीसाठी मनपातर्फे २१ डिसेंबर १८ ते २० जानेवारी १९ पर्यंत अभय योजना सुरू करण्यात आली होती. रविवारी या योजनेचा शेवटचा दिवस असून, नागरिकांनी थकीत मालमत्ता कर भरणा करावा, रविवारी महापालिकेतील चारही झोनचे कर विभागाचे कार्यालय सुरू राहणार आहे. नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी केले आहे. वसुलीचे उद्दिष्ट कठीण असले तरी महापालिकेची यंत्रणा कर वसुलीसाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे. मार्च अखेरपर्यंत मोठा पल्ला आम्ही गाठल्याशिवाय राहणार नाही.-विजय पारतवार,कर अधीक्षक, मनपा, अकोला.