अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव मार्च महिन्यापासून प्रचंड वाढत असतानाच यावर काही उपाय नसल्याने राज्य शासनाने १५ एप्रिल ते १५ मे या दरम्यान संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीच्या कालावधीत तब्बल १४ हजार ७५३ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, तर विनाकारण फिरणाऱ्या ६०० दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केली. त्यानंतर लगेच १५ एप्रिलपासून पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत व शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांनी रस्त्यावर उतरून विनाकारण फिरणाऱ्या दुचाकींवर कारवाई सुरू केली. यासाठी वाहतूक शाखेचे गजानन शेळके यांनी दुचाकीवर दंडात्मक कारवाई सुरू केली. १५ एप्रिल ते १५ मे या एका महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील तब्बल १४,७५३ हजार दुचाकींवर दंडात्मक कारवाई करून ८ लाख १५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ५८६ दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घराबाहेर पडणारे मेडिकल, किराणा, तसेच विविध कारणे सांगत असल्याचे यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. मात्र, पोलिसांनी त्याची उलट तपासणी केली असता अनेकजण खोटे बोलत असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे पोलिसांनी अशा दुचाकींवर कारवाई केली.
१४,७५३ दुचाकींवर कारवाई
५८६ दुचाकी जप्त
आठ लाखांचा दंड वसूल
कारणे खोटी; ६०० जणांवर गुन्हा
घराबाहेर पडणारे दुचाकीचालक मेडिकल, औषधी, दूध, तसेच किराणा आणत असल्याची कारणे सांगत आहे. मात्र, पोलिसांनी त्यांच्यासोबत जाऊन पडताळणी केली असता यामधील बहुतांश दुचाकीचालक यांची कारणे खोटी असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे अशा ६०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.