सचिन राऊत
अकाेला : वाहतूक शाखा अस्तित्वात आल्यापासून २०२१ या वर्षातील सहा महिन्यांत प्रथमच कारवायांचे सर्व रेकाॅर्ड ब्रेक करण्यात आलेले आहेत़ जानेवारी ते जून या सहा महिन्यांत तब्बल ६० हजार ३१६ वाहनांवर कारवाया करण्यात आल्या असून त्यांच्याकडून तब्बल ४१ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़ विशेष म्हणजे या कारवाया करताना कडक संचारबंदीही लागू असताना देखील ऐतिहासिक कारवाया झाल्याचे आकडेवारीवरून समाेर आले आहे़
शहर वाहतूक शाखा अस्तित्वात आल्यापासून आतापर्यंतच्या सर्वोच्च कारवाया या वर्षीच्या पहिल्या सहा महिन्यांत करण्यात आल्या आहेत़ शहरातील वाहतूक सुरळीत करीत असतानाच वेगवेगळ्या मोहिमा व उपक्रम राबवून या कारवाया करण्यात आल्या आहेत़ महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या आदेशानुसार काेरोनाचे निर्बंध व संचारबंदी राबवीत असताना या जम्बो करण्यात आलेल्या आहेत़
गत दहा वर्षांतील कारवायांची आकडेवारी
वर्ष कारवाया वसूल दंड
२०१२ ४३४४० ६३, ७८, ६५०
२०१३ ३१५१३ ४५, ५०,३००
२०१४ ३३९८९ ४६, ३९, ८००
२०१५ ४३५१० ५८, ३०,३५०
२०१६ ५०३४४ ७७, ७८, ८००
२०१७ ५७३१९ १, ४३, ८२७००
२०१८ ६३५६७ १,५८, ०६४००
२०१९ ५९५५६ १,२२,५८९००
२०२० ७४१२८ ७१,९४,६००
५० लाखांचा दंड अनेकांकडे थकीत
२०१९ च्या मे महिन्यापासून वाहतूक शाखेच्या दंडात्मक कारवायांसाठी ई चालान मशीनचा वापर करण्यात येत आहे. या कारवाईसाठी चालान करतेवेळी वाहनचालक हजर नसेल तसेच दंड भरण्यासाठी पैसे नसतील तरीही त्यांच्यावर कारवाई झालेली आहे़ अशा प्रकारचा तब्बल ५० लाख रुपयांचा दंड वाहनचालकांकडे थकीत आहे़ हा दंड भरण्यासाठी राज्यातील काेणत्याही शहरातील पाेलिसांकडे दंड भरण्याची सवलत वाहनचालकास देण्यात आली आहे.
वाहनचालकांच्या घरी नाेटीस
ई चालान मशीनद्वारे दंड आकारल्यानंतर अनेक वाहनचालक दंड भरीत नसल्याचे वास्तव आहे़ त्यामुळे अशा वाहन चालकांच्या निवास स्थानी लेखी नोटीस वाहतूक शाखेकडून पाठविण्यात येत आहेत़ पाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक माेनिका राऊत, शहर पाेलीस उपाधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी या नाेटीस पाठविल्या आहेत़