विनाकारण फिरणाऱ्यांची ३५० वाहने जप्त
अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव मार्च महिन्यापासून प्रचंड वाढत असतानाच यावर काही उपाय नसल्याने राज्य शासनाने १५ ते ३० एप्रिल या दरम्यान संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीच्या कालावधीत तब्बल आठ हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, तर विनाकारण फिरणाऱ्या ३५० दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी लागू केली. त्यानंतर लगेच १५ एप्रिलपासून पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत व शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांनी रस्त्यावर उतरून विनाकारण फिरणाऱ्या दुचाकींवर कारवाई सुरू केली. यासाठी वाहतूक शाखेचे प्रमुख गजानन शेळके यांनीही दुचाकींवर दंडात्मक कारवाई सुरू केली. १५ ते ३० एप्रिल या पंधरा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील तब्बल आठ हजार दुचाकींवर दंडात्मक कारवाई करून लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या साडेतीनशे दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांच्याविरुद्ध विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घराबाहेर पडणारे मेडिकल, किराणा तसेच विविध कारणे सांगत असल्याचे यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. मात्र पोलिसांनी त्याची उलट तपासणी केली असता अनेक जण खोटे बोलत असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे पोलिसांनी अशा दुचाकींवर कारवाई केली.
आठ हजार दुचाकींवर कारवाई
३५० दुचाकी जप्त
१० लाखांचा दंड वसूल
अनेक जणांची कारणे खोटी
घराबाहेर पडणारे दुचाकीचालक मेडिकल, औषधे, दूध तसेच किराणा आणत असल्याची कारणे सांगत आहे. मात्र, पोलिसांनी त्यांच्यासोबत जाऊन पडताळणी केली असता यामधील बहुतांश दुचाकीचालक यांची कारणे खोटी असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे अशा ३५० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
संचारबंदीच्या पहिल्या टप्प्यात म्हणजे पंधरा दिवसांमध्ये वाहतूक शाखेसह अकोला पोलिसांनी आठ हजारांपेक्षा अधिक दुचाकींवर दंडात्मक कारवाई केली आहे. आता दुसऱ्या टप्प्यातही कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये.
गजानन शेळके
प्रमुख वाहतूक शाखा अकोला