अकाेला: शहरात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असतानाही मास्क न लावणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणारे १५० नागरिक सहा व्यावसायिकांजवळून महापालिकेने बुधवारी ५८ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला. यावेळी परवानगीशिवाय दुकान सुरू ठेवणाऱ्या टिळक राेडवरील दाेन दुकानांना सील लावण्याची कारवाई करण्यात आली.
शहरात काेराेना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. काेराेनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याची बाब लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने १५ फेबुवारीपासून शहरासह जिल्ह्यात जमावबंदी लागू केली. शहरात काेराेनाच्या नियमांचे नागरिकांकडून सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे पाहून महापालिका आयुक्त निमा अराेरा यांनी मास्क न लावणाऱ्या व साेशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविराेधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. यासाठी मनपा, पाेलीस व महसूल प्रशासनाच्या संयुक्त पाच पथकांतर्फे कारवाई केली जात आहे.
५८ हजार रुपये दंड वसूल मनपाचे प्रभारी आयुक्त डाॅ.पंकज जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली गठीत केलेल्या पथकाने बुधवारी ताेंडाला मास्क न लावणाऱ्या १५० जणांना दंड आकारला. यामध्ये प्रत्येकी २०० रुपये दंड वसूल करण्यात आला असून, सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणाऱ्या सहा व्यावसायिकांना दंड आकारण्यात आला. यावेळी अकाेलेकरांजवळून एकूण ५८ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला.
दुकानांना सील; हाॅटेल व्यावसायिक रडारवर
महापालिका, महसूल व पाेलिसांनी गठीत केलेल्या पथकांद्वारे बुधवारी टिळक रोडवरील अलंकार माकेट येथील हरिओम स्टील व कैलाश मेटल्स या दुकानांना सील लावण्याची कारवाई करण्यात आली, तसेच टिळक राेडवरील एका भाेजनालयात नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने दंड वसूल केला. यापुढे शहरातील सर्व हाॅटेल, रेस्टाॅरन्ट, खानावळी रडारवर राहणार असल्याचे मनपाने स्पष्ट केले आहे.