अकाेला : शहरात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलांचे मंगळसूत्र चाेरणारे चाेरटे सक्रिय हाेताच वाहतूक शाखेने विना कागदपत्रे दुचाकी चालविणाऱ्या वाहनांवर कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. गत सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल दाेन हजार ९०० दुचाकींवर कारवाई करण्यात आली असून, यामधील ३ दुचाक्या चाेरीच्या निघाल्या आहेत, तर चार दुचाकींचे मालकच आले नसल्याने या दुचाकी वाहतूक शाखेत ठेवण्यात आल्या आहेत.
शहरात वाढत असलेले मोटारसायकल चोरीचे गुन्हे व चेन स्नॅचिंगच्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने कागदपत्रे जवळ न बाळगता किंवा मोबाइलच्या डीजी लॉकर किंवा तत्सम अधिकृत ॲपवर स्कॅन कॉपी न ठेवता वाहन चालविणाऱ्यांची वाहने वाहतूक कार्यालयात जमा करून ठेवण्याची मोहीम अधिक कडक करण्यात आली आहे. ज्या वाहनचालकांकडे वाहनांची कागदपत्रे नाहीत अशा वाहनांची कागदपत्रे पडताळणी केल्यानंतर दंडात्मक कारवाई करून सोडून देण्यात येत आहेत. या मोहिमेचे फलित म्हणून आतापर्यंत चाेरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकूण दाेन हजार ९०० दुचाकी वाहतूक कार्यालयात ठेवण्यात आल्या असून, यामधील बहुतांश दुचाकी दस्तावेज पडताळणी केल्यानंतर साेडण्यात आल्या आहेत. मात्र, ४ दुचाकी आताही वाहतूक कार्यालयात असून, या दुचाकींची वैध कागदपत्रे सादर न केल्यामुळे या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.