नागपूर प्रादेशिक विभागअंतर्गत येणाऱ्या पाचही परिमंडळातील मुख्य अभियंते, अधीक्षक आणि कार्यकारी अभियंते यांची बैठक ८ सप्टेंबरला नागपूर येथे आयोजित करण्यात आली. या बैठकीत प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी सर्व परिमंडळांचा सविस्तर आढावा घेतला. नागपूर प्रादेशिक विभागातील कर्मचाऱ्यांनी थकबाकी वसुली आणि वीज हानी कमी करण्यासाठी नियोजनबद्धरीत्या काम करावे. त्यासाठी मीटर रीडिंग एजन्सीच्या नियमित बैठका घ्यावात. ० आणि १ ते ३० युनिट वीज वापर असणाऱ्या ग्राहकांची काटेकोर तपासणी करावी, तात्पुरता व कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असणाऱ्या ग्राहकांवर लक्ष ठेवून वीज चोरी आढळ्यास कठोर कारवाई करावी, असे निर्देश प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी यावेळी दिले. गणेशोत्सव व सणाच्या काळात ग्राहकांना अखंडित वीज मिळेल यासाठी दक्ष राहणायचे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीत अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये, नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे, गोंदिया परिमंडळाचे मुख्य अभियंता बंडू वासनिक, अमरावती परिमंडळाच्या मुख्य अभियंता पुष्पा चव्हाण, सर्व परिमंडळाचे सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते उपस्थित होते.