अकोला : मद्य प्राशन करून आईला त्रास देणार्या तिच्या मुलासह सुनेला प्रथमश्रेणी न्यायालयाने १0 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. यासोबतच सुनेला आणि मुलाला सुधारण्याची एक वर्षाची संधी दिली असून, त्यांनी वागणुकीत सुधारणा न केल्यास न्यायालय दोन्ही आरोपींना केव्हाही बोलावून शिक्षा सुनावणार असल्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अमोल मधुकर वानखडे व त्याची पत्नी माधुरी अशी आरोपींची नावे आहेत. कृषी नगरातील पंचशील नगर येथील रहिवासी सिंधू मधुकर वानखडे (५५) या घरी असताना जानेवारी २0१५ रोजी त्यांचा मुलगा अमोल (२३) हा मद्य प्राशन करून त्यांच्या घरी आला. त्याने आईला शिवीगाळ करून मारहाण केली. त्याच्या या कृत्यात त्याची पत्नी माधुरीचेही बरोबरीचे सहकार्य होते. त्यामुळे आईने खदान पोलीस स्टेशनला तक्रार दिली. यावरून मारहाण करणे, घरात जबरदस्ती घुसणे, अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस जमादार गजानन हरणे यांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने सात साक्षीदार तपासले, सातवे न्यायाधीश एस. ए. हरणे यांच्या न्यायालयाने आरोपी मुलगा अमोल व त्याची पत्नी माधुरी हिला गुन्हेगारांच्या परिविक्षा अधिनियमांतर्गत दहा हजार रुपये जातमुचलका व जमानतदार यांचे बंदपत्र एक वर्षाच्या कालावधीकरिता शिक्षा सुनावली. यासोबतच जेव्हा न्यायालय आपणास हजर राहण्याकरिता आदेशित करेल, तेव्हा शिक्षेसाठी हजर राहावे, असे आदेश न्यायालयाने दिले. दरम्यानच्या काळात दोन्ही आरोपींनी चांगली वर्तवणूक तथा शांती स्थापन करावी. एक वर्षाच्या कालावधीत दोन्ही आरोपी परिविक्षाधिकारी यांच्या देखरेखीखाली राहतील, असेही आदेशात नमूद केले आहे. यासोबतच त्या दोघांवर अटीही लादल्या आहेत. आरोपी मुलगा अमोल हा वर्षभर नशेपासून दूर राहील. आरोपी मुलगा अमोल व त्याची पत्नी हे सिंधूताई यांना वर्षभर सन्मानाने वागणूक देतील व त्यांचे जबाबदारीने पालनपोषण करतील. भविष्यात त्यांनी कोणताही गुन्हा करू नये, अशी तंबीही न्यायालयाने दिली. त्यासोबतच तीन हजार रुपये नुकसानभरपाई न भरल्यास सहा महिन्यांच्या कारावासाचीही शिक्षा न्यायालयाने सुनावली. सरकार पक्षातर्फे अँड. राजेश अकोटकार यांनी कामकाज पाहिले.
आईला त्रास देणा-या मुलासह सुनेवर कारवाई
By admin | Published: April 30, 2017 3:09 AM