लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू नये, यादृष्टीने प्रशासनामार्फत प्रयत्न सुरू असून, रुग्णांची संख्या नियंत्रित करण्यासाठी करावयाच्या विविध उपाययोजनांचा ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत, अशी माहिती पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी मंगळवारी येथे दिली.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना, रुग्णांची तपासणी यासंदर्भात माहिती देत, रुग्णांची संख्या कमी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.रुग्णांची संख्या वाढू नये, तसेच बाहेरगावाहून जिल्ह्यात येणारे नागरिक आणि जिल्ह्यातून बाहेरगावी जाणारे नागरिक यासंदर्भात घ्यावयाची काळजी आणि करावयाच्या विविध उपाययोजनांचा आराखडा तातडीने तयार करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत, असेही पालकमंत्री बच्चू कडू यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार डॉ. रणजित पाटील, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार रणधीर सावरकर, आमदार नितीन देशमुख, महापौर अर्चना मसने, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस व निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे उपस्थित होते.