अकोला : पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यातील पाणंद रस्ते कामांसाठी एकाही तालुक्यातील कामांचा कृती आराखडा अद्याप सादर करण्यात आला नाही. पाणंद रस्ते कामांचे कृती आराखडे तालुका स्तरावर अडकल्याने, यासंदर्भात करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयातील रोहयो शाखेमार्फत जिल्ह्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी (बीडीओ ) व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना सोमवारी देण्यात आले.गत २७ फेबु्रवारी २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार पालकमंत्री शेत -पाणंद रस्ते योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील पाणंद रस्ते कामांसाठी शासनामार्फत १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यानुषंगाने पाणंद रस्त्यांची कामे करण्यासाठी पाणंद रस्ते कामांचा कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेमार्फत जिल्ह्यातील सातही तहसीलदार, पंचायत समितींचे गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले. वारंवार पत्राद्वारे निर्देश देण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील सातपैकी एकाही तालुक्यातून पाणंद रस्ते कामांचा कृती आराखडा ११ जुलैपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील रोहयो शाखेकडे प्राप्त झाला नाही. पाणंद रस्ते कामांचे कृती आराखडे तालुका स्तरावर अडकल्याने, जिल्ह्यातील पाणंद रस्ते कामांचा कृती आराखडा रेंगाळला आहे. पाणंद रस्ते कामांचे तालुकास्तरीय कृती आराखडे प्राप्त होत नसल्याने, यासंदर्भात करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेमार्फत जिल्ह्यातील सातही तहसीलदार, गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना ११ जुलै रोजी पत्राद्वारे देण्यात आले आहेत.निधी वितरित; आराखडे नाही!पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी शासनामार्फत प्राप्त १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सातही तालुका स्तरावर वितरित करण्यात आला. प्रत्येक तालुका स्तरावर २१ लाख ५० हजार रुपयांचा निधी गत महिन्यात वितरित करण्यात आला; मात्र उपलब्ध निधीतून करावयाच्या पाणंद रस्ते कामांचे तालुकास्तवरील कृती आराखडे अद्यापही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो शाखेकडे सादर करण्यात आले नाही.