दोन प्रतिष्ठानांविरुद्ध गुन्हा दाखल
मास्क न घालणे, सोशल डिस्टंसिंग न पाळणे भोवले
अकोला : शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढत असताना आता प्रशासनाने मास्क न घालणाऱ्यांवर तसेच सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम, परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अमर ठाकूर व सिटी कोतवाली चे ठाणेदार उत्तम जाधव यांनी बुधवारी शहराच्या विविध भागांत कारवाई करीत मास्क न घालणाऱ्या सुमारे २५७ दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यानंतर सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन दुकानदारांनी सोशल डिस्टंसिंगचे पालन न ठेवल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हाभर कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असतानाही शहरात मात्र त्याचे काहीही गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. दर दिवसाला कोरोनाचे १५० ते २०० रुग्ण निघत आहेत. त्यामुळे हा धोका अधिक वाढत असताना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जमावबंदी आदेश लागू केला आहे; मात्र त्यानंतरही शहरात प्रचंड गर्दी होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम, ठाणेदार उत्तम जाधव यांनी सिटी कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक म्हणजेच मास्क न घालणाऱ्या १९९ दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यानंतर टिळक रोडवरील सुनील फॅशन ड्रेसेसचे मालक आनंद हरिमला अडवाणी, ताजनापेठ येथील रामाणी ब्रदर्स, निरमा शिलाई मशीन मालक संतोष प्रकाशलाल रामाणी यांच्याविरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही दुकानांत सोशल डिस्टंसिंग पाळण्यात येत नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. शहरातील वाढत असलेली रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी आता पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून, मास्क न घालणारे तसेच सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. कारवाईचे हे सत्र गुरुवारपासून अधिक कठोरपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती सिटी कोतवालीचे ठाणेदार उत्तम जाधव यांनी दिली.
शहरातील कोणत्याही दुकानात चहा टपरी, पान टपरी, तसेच गर्दीच्या ठिकाणावर सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे व मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनाचा उद्रेक होत असतानाच त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाकडून कठोर पावले उचलण्यात येत आहे. मात्र जे नागरिक या नियमाचा भंग करतील त्यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे. आज, गुरुवारपासून ही कारवाई अधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.
- सचिन कदम
शहर पोलीस उप अधीक्षक अकोला.