अकोला - मोटार वाहन कायाद्याचे उल्लंघन करून विद्यार्थ्यांची असुरक्षित वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षा व इतर वाहनांवर कारवाईसाठी पोलीस अधीक्षक जी़ श्रीधर यांच्या निर्देशावरुन मंगळवारी विशेष मोहीम राबविण्यात आली़ या दरम्यान शहरात अशा प्रकारची वाहतूक करणाऱ्या तसेच विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या ५४ वाहनांवर कारवाइ करण्यात आली़. त्यांच्याकडून सुमारे एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे़.
विद्यार्थ्यांच्या असुरक्षित वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांच्या जीवास मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने तसेच मोठा अपघात होण्याची धोका असल्याने ही मोहीम राबविण्यात आली. शहरात नियमांचे उल्लंघन करून अवैध प्रवासी वाहतूक व विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या एकूण ५४ ऑटोरीक्षा चालकांविरुध्द मोटर वाहन कायद्याअंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली़ यापुढे विशेष मोहीम राबवून नियमांचे उल्लघन करणाऱ्या वाहनधारकांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे. तरी शहरातील अवैध प्रवासी व विद्यार्थीची वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांनी वाहनाला ठरवून दिलेल्या प्रवासी प्रमाणातच विद्यार्थ्यांची वाहतूक करावी, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा वाहतूक शाखेने दिला आहे़