अकोला : महानगरपालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाच्यावतीने शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज काढण्याची कारवाई शनिवारी रात्री राबविण्यात आली. सिटी कोतवाली ठाण्याच्या परिसरातील दुकानांचे अनधिकृत होर्डिंग्ज काढण्यात आले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मनपाने शहरात अनधिकृत, विनापरवाना असलेले होर्डिंग्ज, बॅनर व फलक हटविण्याची मोहीम राबविली आहे. शहरात विनापरवाना अनधिकृतरीत्या होर्डिंग्ज, फलक व बॅनर लावण्यात येऊ नये, अशी सूचना वारंवार केली आहे. त्यानंतरही होर्डिंग्ज लावण्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे ते काढून टाकण्याची कारवाईन मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने केली. दरम्यान कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात विनापरवानगी जाहिरातीचे होर्डिंग्ज लावणार्या नऊ कंपन्यांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी शनिवारी उशिरा रात्री गुन्हा दाखल केला. महापालिकेचे उत्तर क्षेत्रीय अधिकारी गजानन मधुसुदन पांडे (५५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील परिसरामध्ये नऊ कंपन्यांनी विविध प्रकारचे जाहिरातीचे होर्डिंग्ज लावले आहेत. हे होर्डिंंग्ज लावण्यासाठी महापालिका प्रशासनाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. तसेच अवैधरीत्या हे होर्डिंग्ज लावून शहराला विद्रूप केले. गजानन पांडे यांच्या तक्रारीनुसार कोतवाली पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा नऊ कंपन्यांविरुद्ध महापालिका अधिनियम कलम २४४ व शहर विद्रूपीकरण कलम ३ नुसार गुन्हा दाखल केला.
अनधिकृत होर्डिंग्जवर मनपाची कारवाई
By admin | Published: December 01, 2014 12:28 AM