अकोला : वाळूची अवैध वाहतूक रोखण्यासाठी तहसील कार्यालय स्तरावरील गौण खनिज तपासणी पथके कार्यान्वित करण्याचे निर्देश जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना शुक्रवारी दिले.जिल्ह्यात मार्च अखेरपर्यंत केवळ ११ वाळू घाटांचा लिलाव करण्यात आला असून, लिलाव न झालेल्या वाळू घाटांमधून वाळूची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या लगबगीत वाळूची अवैध वाहतूक आणि विक्रीच्या गोरखधंद्यातून वाळू माफिया स्वत:ची चांदी करून घेत असताना, त्याकडे मात्र महसूल प्रशासनाकडून डोळेझाक करण्यात येत आहे. अशा आशयाचे वृत्त शुक्रवार, ५ मार्च रोजी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित करण्यात आले. या वृत्ताची दखल घेत, वाळू आणि इतर गौण खनिजाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी तहसील कार्यालय स्तरावरील तपासणी पथके कार्यान्वित करण्याचे निर्देश जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड यांनी ५ मार्च रोजीच जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना दिले.वाळू आणि इतर गौण खनिजाच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी तहसील कार्यालय स्तरावरील तपासणी पथके कार्यान्वित करण्याच्या सूचना जिल्ह्यातील सातही तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत.- डॉ. अतुल दोड,जिल्हा खनिकर्म अधिकारी.