अकोला : गत महिनाभरापासून अकोल्यासह राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कोविडचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्या तुलनेत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा वाढला आहे. राज्यातील अशा टॉप टेन जिल्ह्यांच्या यादीत अकोला दहाव्या स्थानी आहे. पहिल्या स्थानी पुणे, तर दुसऱ्या स्थानी नागपूर जिल्हा आहे. राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून कोविड संसर्गासाठी मार्च महिना आतापर्यंतचा सर्वात घातक ठरला आहे. या महिन्यातील मागील २४ दिवसांत सर्वाधिक कोविड रुग्ण आढळून आले. वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण मागील काही दिवसांत घटल्याचे दिसून येत आहे. राज्य शसानाच्या कोविड-१९ डॅशबोर्डवरील आकडेवारीनुसार, एकूण रुग्णांच्या तुलनेत राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा ३ लाख ६८ हजार ४५७ वर पोहोचला आहे. मध्यंतरी हे प्रमाण नियंत्रणात आले होते. यामध्ये सर्वाधिक ४३ हजार ५९० ॲक्टिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यातील आहेत, तर नागपूर जिल्ह्यात ३३ हजार १६० रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. या यादीत अकोला जिल्हा दहाव्या क्रमांकावर आहे. अकोल्यातील कोविडच्या ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा ५ हजार ७०४ आहे. वाढती रुग्णसंख्या ही अकोलेकरांसाठी चिंतेची बाब असून, नागरिकांनी वेळीच सावध राहण्याची गरज आहे.
मृत्यूदर १.३७ टक्क्यांवर
वाढत्या रुग्णसंख्येसोबतच मृतांचा आकडाही वाढत आहे. कोरोनामुळे राज्यातील १ लाख ६० हजार ४४१ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत हा आकडा १.३७ टक्क्यांवर आहे. रुग्णसंख्या वाढल्याने मृत्यूदरामध्ये घसरण झाल्याचे दिसत असले, तरी दररोज जाणारे कोरोनाचे बळी ही चिंतेची बाब आहे.
टॉप टेन जिल्हे (ॲक्टिव्ह रुग्ण)
जिल्हा - ॲक्टिव्ह रुग्ण
पुणे - ४३,५९०
नागपूर - ३३,१६०
मुंबई - २६,५९९
ठाणे - २२, ५१३
नाशिक - १५,७१०
औरंगाबाद - १५,३८०
नांदेड - १०,१०६
जळगाव - ६,०८७
अकोला - ५,७०४