अकोला: उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील ५५ शिक्षकांना समुपदेशनाद्वारे पद्स्थापना देण्याची प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण करण्यात आली.जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक बदल्यांच्या प्रक्रियेत अन्याय झाल्याने ५६ शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे धाव घेतली होती. यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार पती-पत्नी एकत्रीकरण जिल्ह्याातील ५५ शिक्षकांना समुपदेशनाद्वारे शाळांवर पद्स्थापना देण्यात आली. तर एका शिक्षकाने पद्स्थापनेस विरोध नोंदविला. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे यांच्यासह जिल्हा परिषद उपाध्यक्ष जमीरउल्लाखा पठाण, शिक्षण सभापती पुंडलीकराव अरबट, प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांच्या उपस्थितीत झालेल्या समुपदेशन प्रक्रियेत पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत ५५ शिक्षकांना जिल्ह्यातील शाळांवर रिक्त जागांवर पद्स्थापना देण्यात आली.