अकोला : पिस्तूल तस्करीप्रकरणात अटक केलेल्या सात आरोपींपैकी तिघे आरोपी हे मोटारसायकल चोरीचाही गोरखधंदा करीत असल्याचे पोलिस तपासात समोर आले. पोलिसांनी तिघा आरोपींकडून दोन मोटारसायकली जप्त केल्या. गुरुवारी आरोपींना मोटारसायकल चोरीच्या गुन्हय़ात स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. शुक्रवारी आरोपींना न्यायाधीश भावना पाल यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली त्यानंतर त्यांना जामीन दिला. स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय ज्ञानेश्वर फड यांना मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी २९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री शिवणीतून अमोल साळवे याला गजाआड केले. त्यानंतर उमेश जोंधळे, उमेश सोळंके, राजकुमार यादव, अमोल जामनिक, पवन गावंडे आणि राहुल शर्मा यांना ताब्यात घेऊन, त्यांच्याकडील तीन पिस्तूल व दोन काडतूस जप्त केले. सोबतच पोलिसांनी अमोल साळवे, उमेश जोंधळे, उमेश सोळंके यांच्याकडून एमएच ३0 एके २११४ व एमएच ३0 एडी ८४८१ क्रमांकाच्या दोन मोटारसायकली जप्त केल्या. या दोन्ही मोटारसायकली चोरीच्या असल्याचे तपासात समोर आले होते. त्यामुळे पोलिसांनी तिघाही आरोपींची चौकशी केली असता, त्यांनी दोन्ही मोटारसायकली चोरल्याची पोलिसांना माहिती दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे हेकाँ राजकुमार मिश्रा, श्रीकृष्ण गायकवाड, राहुल तायडे यांनी गुरुवारी तिघांना ताब्यात घेतले.
पिस्तूल तस्करीसोबतच मोटारसायकल चोरीचाही गोरखधंदा!
By admin | Published: September 14, 2014 1:41 AM