लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि त्यानुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांची तपासणी व उपचार सुविधांचे सुसूत्रीकरण करून रुग्णांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्याकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (जीएमसी) प्रशासक पदाचा अतिरिक्त प्रभार देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शनिवारी दिला.कोरोनाबाधित रुग्णांची दिवसेंदिवस वाढत असलेली संख्या बघता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सोयी-सुविधांचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना सहकार्य करण्यासाठी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव फडके, महिला व बालविकास अधिकारी राजेश जवादे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी संजय देशमुख व डॉ. नेताम यांची नेमणूक करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांची चमू अतिरिक्त जिल्हाधिकारी लोणकर यांच्या निर्देशानुसार ‘जीएमसी’मधील सेवा-सुविधांचे व्यवस्थापन करणार आहे. तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी लोणकर प्रशासक म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याशी समन्वय ठेवून काम करणार आहेत. अतिरिक्त जिल्हाधिकारी लोणकर व त्यांची चमू वैद्यकीय उपचाराव्यतिरिक्त अन्य सेवा-सुविधांविषयक व्यवस्थापन करणार आहे, असेही जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.