अकोला : महावितरण कार्यालयात अतिरिक्त कार्यकारी अभियंता यांच्याशी मीटर रिडिंग घेणाऱ्या कंत्राटदाराने वाद घातला. त्यानंतर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी रामदासपेठ पोलीस ठाण्यात अभियंत्याच्या तक्रारीवरून कंत्राटदाराविरुद्ध रविवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.मलकापूर येथील मेसर्स यशस्वी महिला बचत गटाला ग्राहकांचे मीटर वाचन करण्याकरिता एक वर्षासाठी कंत्राट देण्यात आला आहे. त्यानुसार बचत गटाचे सुपरवायझर यांना अतिरिक्त कार्यकारी अभियंता मोरेश्वर नारायणराव सिरसे यांनी फोन करून बोलावून घेतले. त्यानुसार दोघे जण कार्यालयात आले. यावेळी मोरेश्वर सिरसे यांनी मीटर रिडिंग घेणाºया लोकांना बोलावण्यास सांगितले; मात्र त्यात सर्वच नवीन माणसे लागतील, अशी अट घातली. यावरून अभियंता व त्यांच्यात शाब्दिक वाद झाले. वादाचे रूपांतर नंतर शिवीगाळ व मारहाणीत झाले. यावेळी कार्यालयामध्ये दिलीप बोर्डे, दिनेश इंगळे, विलास देशमुख, अभिजित सोलियो हे कर्मचारी उपस्थित होते. रविवारी मोरेश्वर सिरसे यांच्या तक्रारीवरून रामदासपेठ पोलिसांनी भादंवि ३५३, ५०४, ५०६ नुसार यशस्वी महिला बचत गट मलकापूरचे सुपरवायझर चोपडे व गोपाल ठाकरे व त्यांच्या मीटर रिडरवर गुन्हे दाखल केले आहेत.