अकोला: येथे पश्चिम वऱ्हाडातील अकोला, वाशिम व बुलढाणा जिल्हाकरिता अतिरिक्त प्रादेशिक कार्यालय (ॲ़डिशनल आरओ ऑफिस) सुरु करण्यास मंजुरी दिली आहे. त्यासोबतच या कार्यालयासाठी लागणारे मनुष्यबळ पुरविण्यासाठी पदभरतीकरिता मंजुरी दिल्याने कार्यालया सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आमदार रणधीर सावरकर यांच्यासह लोकप्रतिनिधींनी हे कार्यालय सुरू करण्याची मागणी केली होती.
राज्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे ३५ जिल्ह्यात एकूण १६ प्रादेशिक अधिकारी कार्यालय कार्यरत आहेत. विदर्भातील ११ जिल्ह्याकरिता फक्त २ कार्यालय कार्यरत असल्याने ६ जिल्ह्यामागे १ असे प्रमाण होते. त्यामुळे उद्योजकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. अकोला, वाशिम व बुलढाणा येथील उद्योजकांना १०० ते २५० कि.मी.चा प्रवास करुन कामानिमित्त अमरावती प्रादेशिक कार्यालयात जावे लागते. बरेचदा प्रसंगी प्रादेशिक अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्यास त्यांचा पूर्ण दिवस व्यर्थ जात असल्याचा अनुभव आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर अकोला येथे अतिरिक्त प्रादेशिक कार्यालय तातडीने कार्यान्वित करण्याचा आग्रह आमदार रणधीर सावरकर यांनी २८ जून २०२४ रोजी दिलेल्या पत्रातून उद्योग मंत्री उदय सांवत यांच्याकडे धरला होता. त्यासोबतच जिल्ह्यातील उद्योजक अशोक गुप्ता, अशोक दालमिया, उमेश मालू, निकेश गुप्ता, श्रीकर सोमन, राजेश पाटील, अकोला जिल्हा एमआयडीसी असोशियन, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स व विविध व्यापारी उद्योजक संस्थांकडूनही याबाबत सातत्याने मागणी होत होती. अखेर राज्य शासनाने अतिरिक्त प्रादेशिक कार्यालय सुरू करण्यासोबतच आवश्यक अनुष्यबळ सुरू करण्याचा आदेश ४ जुलै रोजी जारी केला आहे. त्यामुळे कार्यालय सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला.