अकोला : माध्यमिक शिक्षणाधिकाºयांनी जिल्ह्यातील विविध शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या ६६ शिक्षकांपैकी ४२ शिक्षकांचे आॅनलाइन पद्धतीने समायोजन केले. उर्वरित २४ शिक्षकांना समायोजनासाठी शिक्षण उपसंचालकांकडे पाठविले. शिक्षण उपसंचालकांनी जिल्ह्यातील २४ पैकी नऊ अतिरिक्त शिक्षकांचे जिल्ह्याबाहेरील शिक्षण संस्थांमध्ये समायोजन केले खरे; परंतु या शिक्षण संस्थांनी या शिक्षकांना रुजू करून घेण्यास नकार दिल्यामुळे आता कुठे जावे, असा प्रश्न अतिरिक्त शिक्षकांना पडला आहे.शिक्षणाधिकारी कार्यालयाने चार महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांची आरक्षण व विषयनिहाय माहिती मागविली होती. त्यानुसार जिल्ह्यात ६६ अतिरिक्त शिक्षकांची माहिती शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाली. या ६६ अतिरिक्त शिक्षकांचे जिल्हा स्तरावर आॅनलाइन पद्धतीने समायोजन करण्याचा कार्यक्रम आखला. प्रारंभी शिक्षणाधिकाºयांनी ६६ पैकी ४२ शिक्षकांचे जिल्ह्यातील विविध शाळांमधील रिक्त पदांवर समायोजन केले आणि २४ अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा विषय अमरावती विभाग स्तरावर शिक्षण उपसंचालकांकडे पाठविण्यात आला. जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये या शिक्षकांच्या आरक्षण व विषयानुसार रिक्त पदे असल्यामुळे त्यांनी जिल्ह्यातील शाळांमध्ये समायोजन करण्याची विनंती केली होती; परंतु त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करून आणि नियमांना डावलून, शिक्षण उपसंचालकांनी २४ पैकी नऊ अतिरिक्त शिक्षकांचे बुलडाणा जिल्ह्यातील विविध शिक्षण संस्थांमध्ये समायोजन केले; परंतु या शिक्षण संस्थांनी अतिरिक्त शिक्षकांना रुजू करून घेण्यास नकार दिल्यामुळे शिक्षकांची गोची झाली आहे. आता कुठे जावे, असा प्रश्न शिक्षकांना भेडसावत आहेत. जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये आरक्षण व विषयानुसार शिक्षकांची पदे रिक्त असताना, या शिक्षकांना जिल्ह्याबाहेर पाठविण्याचे प्रयोजनच काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील शाळांमध्येच या शिक्षकांचे समायोजन व्हायला हवे, असा शिक्षकांचा आग्रह आहे. अतिरिक्त शिक्षकांवर अन्याय होत असताना शिक्षक संघटना त्याविषयी बोलायला तयार होत नाहीत. त्यामुळे दाद मागावी कुणाकडे, अशा विवंचनेत अतिरिक्त शिक्षक सापडले आहेत. (प्रतिनिधी)