अकोला: जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त ठरलेल्या १0९ पैकी ६६ शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया १ डिसेंबर रोजी राबविण्यात येणार आहे; परंतु सध्या अतिरिक्त शिक्षक टेन्शनमध्ये आले असून, समायोजन प्रक्रियेदरम्यान ग्रामीण भागाऐवजी शहरातील शाळा आणि पूर्ण पटसंख्या असलेली शाळा मिळावी, अशी शिक्षकांना अपेक्षा आहे. गुरुवारी अतिरिक्त ठरलेल्या जवळपास १५ शिक्षकांनी हरकती नोंदविल्या आहेत. त्यांच्या हरकतींवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे.गत काही दिवसांपासून शाळांमार्फत अतिरिक्त शिक्षकांची नावे मागविण्यात आली होती. आरक्षण, विषयनिहाय आणि रिक्त पदांची माहिती आल्यानंतर शिक्षण विभागाने शाळांनी पाठविलेल्या अतिरिक्त शिक्षकांची पडताळणी केली. यात १२६ शिक्षक अतिरिक्त ठरले होते. यापैकी काही शिक्षकांना त्यांच्या संस्थेंतर्गतच रिक्त पदांवर पदस्थापना देण्यात आली. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांची संख्या १२६ वरून १0९ वर आली. या शिक्षकांच्या नावांची यादी शिक्षणाधिकारी कार्यालयाने बुधवारी प्रसिद्ध केली. जिल्ह्यातील शाळांमधील १0९ पदे रिक्त असल्याने, या शिक्षकांचे या जागांवर समायोजन होणार आहे; परंतु अतिरिक्त शिक्षक चिंतातुर झाले आहेत. ग्रामीण भागातील शाळेऐवजी विद्यार्थी पटसंख्या चांगली असलेली शहरातील शाळा मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा शिक्षक करीत आहेत. यात सर्वांनाच शहरातील शाळा मिळतील, असे नाही. अनेकांना ग्रामीण भागातील शाळेतसुद्धा जावे लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांची झोप उडाली आहे. बहुतांश शिक्षक शहरातील शाळेतच समायोजन मिळाले पाहिजे, अशी प्रार्थना करीत आहेत. आता त्यांची प्रार्थना किती फळाला येते, हे शनिवारी स्पष्ट होईल.म्हणून शिक्षकांना हवी रिक्त पदांच्या शाळांची माहितीअतिरिक्त शिक्षकांची यादी जाहीर केल्यानंतर रिक्त पदे असलेल्या शाळांची यादीसुद्धा जाहीर करावी, अशी मागणी शिक्षक करीत होते; परंतु रिक्त पदांच्या शाळांची माहिती जाहीर केल्यावर घोडेबाजार सुरू होण्याची शक्यता लक्षात घेता, शिक्षण विभागाने शनिवारीच शिक्षकांना स्क्रीनवर शाळा दाखविण्याविषयी स्पष्ट केले.शिक्षक घेताहेत रिक्त पदांची माहितीसमायोजन होण्यापूर्वीच अनेक शिक्षक आपल्या सहकारी शिक्षकांकडून शहरातील कोणत्या शाळेत किती पदे रिक्त आहेत, आरक्षण, विषय, इयत्ता आदी माहिती घेत आहेत आणि कोणती शाळा समायोजनासाठी योग्य आहे, हे चाचपडून पाहत आहेत.
अतिरिक्त शिक्षकांकडून गुरुवारी हरकती नोंदविण्यात आल्या. त्यांच्या हरकतींवर शुक्रवारी सुनावणी होईल. त्यांची बाजू ऐकून घेण्यात येईल आणि समायोजनाची प्रक्रिया पारदर्शक होईल.- देवेंद्र अवचार, उपशिक्षणाधिकारीमाध्यमिक.