अकोला : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग, रुग्णसंख्येसोबतच मृत्यूचा आकडाही वाढत असल्याने वैद्यकीय यंत्रणेवर ताण वाढत आहे. तसेच वैद्यकीय साधनसामग्री व सोयीसुविधांची कमतरता असल्याने, जिल्ह्यात पुरेशी वैद्यकीय साधनसामग्री उपलब्ध करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता तथा रुग्णकल्याण समितीचे सदस्य पराग गवई यांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असून, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आणि मृत्यूचा आकडाही झपाट्याने वाढत आहे. परिणामी वैद्यकीय यंत्रणेवर ताण वाढत असून, वैद्यकीय साधनसामग्री व सोयीसुविधांची कमतरता भासत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात पुरेशी वैद्यकीय साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात यावी तसेच ऑक्सिजन सिलिंडरची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि कोरोनाच्या नावाखाली विविध चाचण्यांच्या माध्यमातून खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची होणारी आर्थिक लूट थांबविण्यात यावी, अशी मागणी पराग गवई यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
रेमडेसिविर इंजेक्शन
अल्पदरात उपलब्ध करावे
कोरोनाबाधित रुग्णांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन अल्परात उपलब्ध करुन देण्यात यावे तसेच जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयातील उपलब्ध खाटा, व्हेंटिलेटरची दैनंदिन माहिती प्रसिध्द करण्यात यावी व रुग्णांच्या सोयीसाठी जिल्हास्तरावर हेल्पलाईन सुरू करण्याची मागणीही पराग गवई यांनी निवेदनात केली आहे.