अकोला, दि. १0- दोन हजार अकोलेकर शुक्रवारी जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त आयोजित सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमाला लाल बहादूर शास्त्री क्रीडांगणावर एकत्रित आले होते. सकाळच्या कोवळ्य़ा उन्हात ओम आदित्याय नम: मंत्राच्या निनादाने अवघे शास्त्री क्रीडांगण दणाणून गेले होते. स्त्री-पुरुषांपेक्षा बालक-बालिकांचा कार्यक्रमात लक्षणीय सहभाग होता.क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालय, क्रीडा भारती, अजिंक्य फिटनेस पार्क, पतंजली योग समिती, शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, मनपा आयुक्त अजय लहाने, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता राजेश कार्यकर्ते, जिल्हा परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सर्मथ शेवाळे, शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रकाश मुकूंद, शिक्षणाधिकारी प्राथमिक प्रशांत दिग्रसकर, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, ऑल इंडिया कॅरम फेडरेशनचे प्रभजितसिंह बछेर, विदर्भ वेस्टा संघटनेचे अध्यक्ष डॉ. गजानन नारे, क्रीडा भारती विभागीय अध्यक्ष डॉ. प्रशांत मुळावकर, क्रीडा भारतीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश उटांगळे, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, वरिष्ठ फुटबॉलपटू दिलीप बिसेन उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेखर पाटील यांनी केले. जिल्हा परिषद अध्यक्ष शोभा वाघोडे यांनी आपल्या भाषणात, उत्तम आरोग्यासाठी नियमित सूर्यनमस्कार काढणे आवश्यक असल्याचे सांगितले. यानंतर अभियंता विनायक पांडे गुरुजी यांनी शंखनाद करू न सामूहिक सूर्यनमस्काराला सुरुवात करण्यात आली. १२ सूर्यनमस्कार मंत्रासह सामूहिकरीत्या करण्यात आले. सूर्यनमस्कार व इतर आसनांचे संचालन अजिंक्य फिटनेस पार्कचे संचालक धनंजय भगत यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा समन्वयक प्रकाश अंधारे यांनी केले. आभार क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांनी मानले.दिव्यांगांचे आसनबालविकास विशेष शाळा कर्णबधिर शाळेच्या मुलांनी शिक्षिका नीलिमा पाटील यांच्या मार्गदर्शनात सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमात सहभाग नोंदविला. नेत्रहिन सुभाष माहुलकर यांनीदेखील पूर्ण योगासन व सूर्यनमस्कार काढले. गतिमंद आशिष नेताम याने तर अचूक पद्धतीने पूर्ण सूर्यनमस्कार आसन केले.
आदित्याय नम: मंत्राच्या निनादाने दणाणले शास्त्री क्रीडांगण
By admin | Published: February 11, 2017 2:34 AM