लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : विश्वचषक क्रिकेट १९ वर्षांआतील विजेत्या संघातील खेळाडू आदित्य ठाकरे याचे शुक्रवारी गीतांजली एक्स्प्रेसने अकोल्यात स्वगृही आगमन झाले. रेल्वेस्थानकावर त्याचे अकोलेकरांनी जल्लोषात स्वागत केले. आदित्यच्या स्वागतासाठी अकोलेकर क्रिकेट खेळाडूंसह अन्य खेळाडूंनीही हजेरी लावली होती. जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी, आदित्यचे प्रशिक्षक भरत डिक्कर, मार्गदर्शक जावेद अली, वडील डॉ. शैलेश ठाकरे, काका गोपी ठाकरे, माजी रणजीपटू नंदू गोरे, रणजीपटू रवी ठाकूर यांच्यासह क्रिकेटप्रेमी व नातेवाईक आणि चाहतावर्ग उपस्थित होता.रेल्वेस्थानकावरच रेल्वे पोलिसांनीदेखील आदित्यचे स्वागत केले. अकोल्यातील क्रिकेट खेळाडूला देशाच्या संघाचे प्रतिनिधित्व करण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली आणि संघाने विजेतेपद मिळविले. जेतेपदाचा क्षण आयुष्यातील सर्वात आनंददायी होता. आस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम लढतीत प्रेक्षकांचाही पाठिंबा संघाला होता. त्यापेक्षा संघ प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे प्रोत्साहन संघाला मिळत होते. भारतीय संघाला तिरंगा फडकविण्यात यश आले, असे यावेळी आदित्य म्हणाला.
आज मोर्णा काठावर आदित्यचा सन्मानअकोला जिल्हा प्रशासनाच्यावतीने उद्या शनिवार, १0 फेब्रुवारी सकाळी ९ वाजता मोर्णा नदी काठ, गीता नगर येथे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या हस्ते आदित्यचा सन्मान करण्यात येणार आहे.
आई-वडील पाहत होते पोराचं कौतुकआदित्यच्या स्वागतासाठी रेल्वेस्थानकावर स्वयंस्फुर्तीने अकोलेकर क्रिकेटप्रेमी आले होते. आदित्यचे हे कौतुक त्याचे आई-वडील डोळे भरू न पाहत होते. आदित्य गाडीतून उतरताच त्याच्या वडिलांनी त्याला घट्ट मिठी मारू न कौतुक केले, तर आईच्या डोळ्यांमधून आनंदाश्रू वाहत होते.