अकोला: शहरातील एका खासगी अनुदानित शाळेवरील आठ शिक्षक अतिरिक्त ठरल्यामुळे त्यांचे महापालिकेच्या शिक्षण विभागात उर्दू माध्यमासाठी समायोजन करण्यात आले. शिक्षण उपसंचालकांच्या निर्देशानुसार संबंधित शिक्षकांचे तात्पुरते समायोजन करण्यात आल्याची माहिती आहे.मनपाच्या शिक्षण विभागात एकूण २६४ शिक्षक सेवारत आहेत. यामध्ये उर्दू माध्यमासाठी १३४ पदे मंजूर असून, त्यापैकी १७ पदे रिक्त होती. उर्वरित १३० शिक्षकांमध्ये मराठी व हिंदी माध्यमातील शिक्षकांचा समावेश आहे. मराठी माध्यमाच्या तुलनेत उर्दू माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून, हे चांगले संकेत मानले जात आहेत. संबंधित शाळेवर शिक्षणाचे धडे देणारे अनेक शिक्षक स्वत: आर्थिक मदतीच्या माध्यमातून शाळेच्या प्रगतीला हातभार लावत असल्याचे चित्र आहे. परिणामी विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढत चालल्यामुळे शिक्षकांच्या पदाला मंजुरी मिळाली आहे. यादरम्यान, १३४ उर्दू शिक्षकांपैकी १७ पदे रिक्त होती. मध्यंतरी शहरातील एका खासगी अनुदानित शाळेवर कार्यरत उर्दू माध्यमातील आठ शिक्षक समायोजन प्रक्रियेत अतिरिक्त ठरले. शिक्षण उपसंचालक, अमरावती यांच्या निर्देशानुसार संबंधित शिक्षकांचे मनपाच्या शिक्षण विभागात तात्पुरते समायोजन करण्यात आले. त्यांचे वेतन, भत्ता तसेच इतर सुविधांचा भार मनपाच्या तिजोरीवर नसून, शासनाकडून ही सर्व प्रक्रिया पार पडली जाणार असल्याची माहिती आहे.