लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरात अवघ्या ३० दिवसांच्या कालावधीत कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांनी शंभरी पार केली आहे. अल्प कालावधीत शहरात कोरोनाचा झालेला उद्रेक लक्षात घेता जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा प्रशासन तसेच महापालिका प्रशासनाकडे ठोस आराखडाच तयार नसल्याचे चित्र समोर आले आहे. संबंधित तीनही यंत्रणांमध्ये आपसात समन्वयाचा अभाव असल्यामुळे की काय, शहरात आजही कोरोनाच्या मुद्यावर प्रयोग राबविण्यात यंत्रणांनी धन्यता मानल्याचे दिसत आहे. केंद्र व राज्य शासनाने कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी २३ मार्च रोजी टाळेबंदी जाहीर केली. यादरम्यान नागरिकांनी घरामध्येच राहून स्वत:ची व कुटुंबीयांची काळजी घेण्याचे आवाहन सातत्याने केले जात होते. शासनाने टाळेबंदी लागू करताच जिल्हा प्रशासन, जिल्हा सामान्य रुग्णालय व महापालिका प्रशासनाने एकत्र येऊन कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ठोस कृ ती आराखडा तयार करण्याची नितांत गरज होती. या ठिकाणी मात्र तीनही यंत्रणांचा आपसात समन्वय नसल्याचे चित्र सातत्याने दिसून आले. त्याचे परिणाम आता सर्वसामान्य अकोलेकरांना भोगावे लागत आहेत. महापालिका क्षेत्रात प्रभाग क्रमांक ११ मधील बैदपुरा परिसरात कोरोनाचा पहिला ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण ७ एप्रिल रोजी आढळून आला.हा परिसर अत्यंत दाट लोकवस्तीचा असल्यामुळे मनपा प्रशासनाने प्रभाग क्रमांक ११ मधील परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करीत कोरोनाबाधित रुग्णांचे निकटवर्तीय व परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन आरोग्य तपासणीला प्रारंभ केला. कोरोना ‘पॉझिटिव्ह’ असलेल्या रुग्णांचे निकटवर्तीय तसेच संशयित नागरिकांना मनपाच्यावतीने पुढील आरोग्य तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविले जात असताना या ठिकाणी संबंधित संशयित नागरिकांची थातूरमातूर पद्धतीने आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला. यामुळेच बैदपुरा परिसरातील नागरिकांमध्ये कोरोनाची मोठ्या प्रमाणात लागण झाल्याचा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेता साजिद खान पठाण यांनी केला आहे. शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येने शंभरी पार केल्यामुळे केंद्र शासनाने नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केलेले जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपानंतर तपासणीशहरातील काही डॉक्टरांनी कोरोनाच्या तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेतली होती. यावेळी संबंधित डॉक्टरांनी रुग्णालय प्रशासन तसेच वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क साधला होता. तरीही त्यांना नमुने घेण्यासाठी तब्बल चार तास ताटकळत ठेवण्यात आले. अखेर याप्रकरणी लोकप्रतिनिधींनी हस्तक्षेप करीत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर संशयित डॉक्टरांचे नमुने घेण्यात आले. यादरम्यान, अत्यंत वाईट वागणूक देण्यात आल्याचे संबंधित डॉक्टरांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले.
रुग्णांची हेळसांड; नातेवाइकांमध्ये संतापकोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात तातडीने उपचार न करता दिरंगाई केली जात आहे. रुग्णांना पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा अभाव असून, वेळेवर जेवण दिले जात नाही. स्वच्छतागृहांमध्ये घाण व दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून, अशा परिस्थितीत रुग्णालयात उपचार कसा घ्यायचा, असा संतप्त सवाल रुग्णांच्या नातेवाइकांनी उपस्थित केला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होणाºया रुग्णांना अतिशय हीन दर्जाची वागणूक दिली जात असून, त्यांच्यावर योग्यरीत्या उपचार होत नसल्याच्या तक्रारी आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता रुग्णालय प्रशासनाची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.- नितीन देशमुखजिल्हाप्रमुख तथा आमदार शिवसेना