अकोला: पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यातील ८४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना व लंघापूर प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसह ४६ गावांत नळ योजनांची विशेष दुरुस्ती व तात्पुरत्या नळपूरक नळ योजनांच्या कामांकरिता २ कोटी ३४ लाख ७७ हजार ३७४ रुपयांच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवार, १ एप्रिल रोजी दिला.
जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात समाविष्ट ४६ उपाययोजनांच्या कामांची अंदाजपत्रके जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आली होती. त्यानुषंगाने जिल्ह्यातील ८४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आणि लंघापूर ५७ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसह ४६ गावांत पाणीटंचाई निवारणासाठी नळ योजना विशेष दुरुस्ती आणि तात्पुरत्या पूरक नळ योजनांच्या ४६ कामांच्या अंदापत्रकांना प्रशासकीय प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला. २ कोटी ३४ लाख ७७ हजार ३७४ रुपयांच्या कामांमध्ये ४१ नळ योजनांची विशेष दुरुस्ती आणि ५ तात्पुरत्या पूरक नळ योजनांचा कामांचा समावेश आहे.
सात नळ योजना विशेष
दुरुस्तीच्या कामांना मान्यता!
जिल्ह्यातील सात नळ योजनांच्या विशेष दुरुस्ती कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला. ७४ लाख ३६ हजार ५८० रुपयांच्या निधीतून प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या उपाययोजनांच्या कामांमध्ये अकोला तालुक्यातील बादलापूर, बार्शीटाकळी तालुक्यातील ढाकली, उजळेश्वर, खांबोरा, खडकी, बाळापूर तालुक्यातील वझेगाव ग्रामीण पाणी पुरवठा योजना व पारस इत्यादी सात नळ पाणी पुरवठा योजनांच्या विशेष दुरुस्ती कामाचा समावेश आहे.