अकोला : जिल्ह्यातील अकोट व तेल्हारा या दोन तालुक्यांत चार गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ३० एप्रिल रोजी दिला. त्यामुळे संबंधित गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा दीड महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला आहे. कृती आराखड्यात समाविष्ट पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना करण्यासाठी कामांचे प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्यात येत आहेत. त्यामध्ये अकोट तालुक्यातील कुटासा व दनोरी आणि तेल्हारा तालुक्यातील जाफ्रापूर व उमरी या चार गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी तीन नळ योजनांची विशेष दुरुस्ती व एक तात्पुरती पूरक नळ योजना अशा चार उपाययोजनांच्या कामांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुषंगाने संबंधित चार गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी ४५ लाख रुपयांच्या निधीतून तीन नळ योजनांची विशेष दुरुस्ती व एक तात्पुरती पूरक नळ योजना इत्यादी चार उपाययोजनांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ३० एप्रिल रोजी दिला. प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली पाणीटंचाई निवारणाची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.