जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत जिल्हा रस्ते विकास व मजबुती कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातील अकोला, अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूर व बार्शिटाकळी या तालुक़्यात ९ रस्ते कामांसह अकोट तालुक्यात लामकानी येथे नदीवर पूल बांधकामास जिल्हा नियोजन समितीने मंजूरी दिली आहे. ४ कोटी ६५ लाख रुपयांच्या या रस्ते व पूल बांधकामास जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. यासोबतच जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक शाळा इमारतींची बांधकामे, प्राथमिक शाळांची विशेष दुरुस्ती व मराठी माध्यमिक शाळा दुरुस्तीच्या कामांसाठी ३० लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या कामांनाही या सभेत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, उपाध्यक्ष सावित्री राठोड, समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुभाष पवार, समितीचे सदस्य ज्ञानेश्वर सुलताने, गोपाल दातकर, गजानन पुंडकर, चंद्रशेखर चिंचोळकर, प्रशांत अढाऊ, गजानन पुंडकर, प्रकाश अतकळ, रायसिंग राठोड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
पशुवैद्यकीय दवाखान्यांना
औषधी पुरवठ्यास मान्यता!
जिल्हा वार्षिक सर्वसाधारण याेजनेंतर्गत ४५ लाख रुपयांच्या निधीतून जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांना आैषधीचा पुरवठा करण्यास या सभेत मंजूरी देण्यात आली.
बाळापूर विस्तार अधिकाऱ्यांचा
प्रभार काढण्याची मागणी
दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत वाडेगाव येथील कामासाठी निवीदा प्रक्रियासंदर्भात प्राप्त तक्रारीच्या चौकशीसाठी बाळापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांसोबत विस्तार अधिकारी आर. के.देशमुख गेले होते. त्यावर आक्षेप घेत विस्तार अधिकारी आर.के. देशमुख यांच्याकडील विस्तार अधिकारीपदाचा प्रभार काढण्याची मागणी सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर यांनी सभेत केली.