अकोला: चालू वर्षातही विज्ञान शाखेत प्रवेश आॅफलाइन पद्धतीने देण्याचे ठरले आहे. प्रवेश प्रक्रिया १३ जूनपासून सुरू होत आहे. त्यासाठी केंद्रीय प्रवेश समितीचे गठन केल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी सोमवारी पत्र परिषदेत दिली.अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद आगरकर विद्यालयात १३ ते १७ जूनपर्यंत अर्ज दिले जाणार आहेत. प्रवेश समितीने ठरवून दिलेल्या संगणक केंद्रावर विद्यार्थ्यांनी आॅफलाइन अर्ज भरावे, त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. ३० जूनपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. माध्यमिक शिक्षणाधिकाºयांच्या नियंत्रणात प्रवेश समितीकडून ही प्रक्रिया होणार आहे. समितीमध्ये अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. विजय नानोटी, सचिव गजानन चौधरी, उपाध्यक्ष प्राचार्य शत्रुघ्न बिरकड, उपप्राचार्य डॉ. अविनाश बोर्डे, महिला प्रतिनिधी भारती दाभाडे यांची समिती गठित करण्यात आली.अकोला महापालिका क्षेत्रातील महाविद्यालयात इतर ठिकाणाहून आलेल्या विद्यार्थ्यांनाही इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश मिळणार असल्याचे मुकुंद म्हणाले. महापालिका क्षेत्रात ५३ महाविद्यालये आहेत. त्यामध्ये ८,१०० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. त्याबाबत पालक, विद्यार्थ्यांनी बिनधास्त राहावे, असेही ते म्हणाले. प्रवेशासंदर्भात काही अडचण असल्यास माध्यमिक शिक्षणाधिकारी, तसेच सहायक शिक्षण उपनिरीक्षक आत्माराम राठोड यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
प्रवेशासाठी आरक्षणाचा लाभकेंद्रीय प्रवेश पद्धतीने दिल्या जाणाºया प्रक्रियेत शासनाच्या आरक्षण धोरणानुसार प्रवेश दिले जातील. त्यामध्ये इतर मागासवर्गीय १९ टक्के, अनुसूचित जाती-१३, अनुसूचित जमाती-७, विमुक्त जाती-३, भटक्या जमाती (ब)-२.५, भटक्या जमाती (क)-३.५, भटक्या जमाती(ड)-२, विशेष मागास प्रवर्ग-२ टक्के याप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहेत.
प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रककॅम्पस कोटा व मायनॉरिटी कोटा प्रवेश १३ ते १८ जूनपर्यंत होतील. सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी प्रवेश अर्ज १३ ते १६ जूनदरम्यान मिळतील. त्याच काळात अर्ज स्वीकारले जाणार आहेत. द्विलक्षी अभ्यासक्रम तसेच विशेष राखीव संवर्गाची यादी २१ जून रोजी प्रसिद्ध केली जाईल. संपूर्ण विद्यार्थ्यांची प्रवेश यादी २ जुलै रोजी समितीकडे सादर केली जाणार आहे.