बार्शिटाकळी : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता ४५ वर्षांवरील वयोगटातील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, तसेच सर्वांनी तपासणी करावी यासाठी येथील महसूल विभागाने उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांच्या संकल्पनेतून तहसील कार्यालयात विविध कामानिमित्त येणाऱ्यांनी लसीकरण किंवा तपासणी केली असेल त्यांनाच तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना भेटण्याची परवानगी असणार आहे, असा आदेश काढण्यात आला असून, तो आदेश तहसील कार्यालय परिसरातील दर्शनी भागात लावण्यात आला आहे.
तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करावे, कोविड-१९ ची तपासणी करावी हा प्रमुख हेतू साध्य करण्यासाठी महसूल विभागाने आदेश जारी केला आहे. आदेशाचे पालन होते किंवा नाही यासाठी तहसीलदार गजानन हामंद लक्ष ठेवून आहेत. शहरातील गर्दीच्या ठिकाणावर पोलिसांचा वॉच असणार आहे. शहरासह ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असून, प्रशासनातर्फे १५ दिवसांची संचारबंदी लागू केली आहे. तालुक्यात आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईची मोहीम पोलीस प्रशासनाने सक्रिय केली आहे. तालुक्यातील धाबा, कान्हेरी सरप, पिंजर, महान या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत व बार्शीटाकळी ग्रामीण रुग्णालय क्षेत्रात गुरुवारपर्यंत सात हजार जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे. तसेच तालुक्यातील सर्व दुकानदार, व्यावसायिकांनी त्वरित कोरोना चाचणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.