अकोला : हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत शेती व्यवसाय स्थित्यंतरे अनुभवत आहे. ऋतुमानातील बदलांसह अवकाळी पाऊस, अति किंवा अल्प पाऊस, पिकांचे अति संवेदनशील अवस्थेत होणारे हवामानातील बदल परिणामी कीड-रोगांचा प्रादुर्भाव अथवा उत्पादनातील घट या सर्व बाजूंचा एकंदरीत शेती व्यवसायावर परिणाम होताना दिसत आहे. शाश्वत शेतीमध्ये केवळ सिंचनासाठी पाण्याची उपलब्धताच नव्हे तर कृतियुक्त जलसाक्षरता अंगीकारणे अधिक कालसुसंगत ठरत असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. दिलीप मानकर यांनी केले.
जागतिक जल दिनाच्या निमित्ताने विस्तार शिक्षण संचालनालय, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाद्वारा ‘उन्नत भारत अभियान व पाणलोट क्षेत्र विकास आदर्श गाव निर्मिती’ प्रकल्पांतर्गत तिवसा तालुका बार्शीटाकळी येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. जल पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थितीत तिवसा गावचे सरपंच गजानन लुले, उपसरपंच ज्योतीताई इंगोले, विद्यापीठाचे प्रा. विस्तार शिक्षण तथा मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रमोद वाकळे, विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. विनोद खडसे, मुख्य संपादक प्रा. संजीवकुमार सलामे, विद्यापीठ मुद्रणालयाचे प्रमुख डॉ. सुहास मोरे, पोलीस पाटील संदीप मनवर, रेखाताई साठे, सुरेश पाटील आदींची उपस्थिती होती.
शेतकरी उत्पादक कंपन्या तथा महिला बचत गटांचे प्रभावी समन्वयातून आदर्श गाव निर्मितीसाठी विद्यापीठ कटिबद्ध असल्याचे डॉ. मानकर यांनी सांगितले. प्रास्ताविक विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ.विनोद खडसे यांनी तर पाणी फाऊंडेशनच्या वाकोडे यांनी फाऊंडेशनच्या उपक्रमाविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन विस्तार शिक्षण संचालनालयाचे प्रा. संजीवकुमार सलामे यांनी तर आभार प्रदर्शन विद्यापीठ मुद्रणालयाचे प्रमुख डॉ. सुहास मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पोलीस पाटील संदीप मनवर, विलास घरत, सुरेश लुले, अतुल लुले, दिवनाले, रविकांत धनभर, पुसदेकर, चक्रनारायण आदींनी परिश्रम घेतले.