अकाेला : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाद्वारे उन्नत भारत अभियानांतर्गत पाच दत्तक गावांचा विकास करण्यात येणार आहे. यात मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा, मासा सिसा या गावांचा समावेश असून, उर्वरित गावांमध्ये चिखलदरा तालुक्यातील चिचाटी, अचलपूर तालुक्यातील सावळी दतुरा, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव (बैनाई), ही गावे दत्तक घेण्यात आली आहेत.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत असून विकासासाठी विभागीय समन्वय संस्थेच्या सभेमध्ये दत्तक गावातील सामर्थ्य आणि दुर्बलता हे मुद्दे विचारात घेण्यात आले. महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने दुग्धसंकलन केंद्र, डेअरी फार्म, कौशल्य विकास, पशुधन था मत्स्य व्यवसाय, मिल्क बाय प्रॉडक्ट आदींबाबत या सभेत प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारली आहे.
कृषी विद्यापीठाकडे कृषी आधारित उद्योगांची धुरा
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून कृषी आधारित उद्योग तथा कौशल्य विकासाचे नियोजन, शेती, जैविक शेती आदी तंत्रज्ञान विकासासंदर्भात कृषी विद्यापीठाने जबाबदारी स्वीकारली आहे.
रोजगारावरही असणार भर
वीटभट्टी, फळ उद्योग, डाळ मिल, रोजगारासाठी इलेक्ट्रिकल्स, मेकॅनिकल वर्कशॉप, कृषीवर आधारित उद्योग, सोलर प्लान्टच्या माध्यमातून ऊर्जेचे नूतनीकरण व त्याचा दैनंदिन वापर, सर्वसमावेशक शिक्षणाची व्यवस्था या ग्रामीण विकासाच्या योजनांवर अभ्यास करण्यात आला. दत्तक गावांतील उपलब्ध संसाधनाने समस्यांचे निराकरण करावे लागणार आहे.