- शिखरचंद बागरेचा लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : मानव जन्म संसाररुपी भौतिक सुखात वाया घालविण्यापेक्षा भगवान महावीर यांनी सन्यास घेऊन अंगीकारलेला मार्ग मानवाचे कल्याण करणारा आहे. त्याचाच आदर्श समोर ठेऊन हुबळी (कर्नाटक) येथील दिक्षार्थी बंधू आर्यन मुलानी या १८ वर्षीय युवकाने भौतिक सुखाचा त्याग करून जैनमुनी दिक्षा ग्रहण करण्याचा दृढ निश्चय केला असून हा कार्यक्रम १ डिसेंबर रोजी शिरपूर जैन येथे होणार आहे. यासंदर्भात त्यांच्याशी साधलेला हा संवाद...
धार्मिक व अध्यात्माकडे जाण्याची ओढ आपणास कशी लागली?बालपणापासूनच घरातील वातावरण धार्मिकतेचे आहे. आजी, आजोबा, आई, बाबा, काका, काकू, मामा, मामी ही सर्व वडिलधारी मंडळी सुरूवातीपासूनच धार्मिक वृत्तीची असल्याने त्याचा प्रभाव माझ्यावर पडला. धर्माबद्दल आदर आणि संस्कार घरातूनच मिळत गेले. नियमित मंदिरात जाणे, भगवंताचे दर्शन, वंदन व पुजन करण्यातून धार्मिक व अध्यात्माकडे वाटचाल करण्याची ओढ लागली.
कोणत्या संत मुनिश्रींकडून दिक्षा घेण्याची प्रेरणा मिळाली ?कुटूंबात यापूर्वी माझ्या काकांनी जैन मुनी म्हणून दिक्षा घेतली आहे. सद्या ते जैन संत बहुश्रुतशेखर विजयजी महाराज यांच्यासोबत जिनशासनच्या सेवेत रममान आहेत. गुरु भगवंत आचार्यश्री जयानंद सुरीश्वरजी महाराज यांच्यासह आचार्यश्री अजीतशेखर सुरीश्वरजी महाराज व आचार्यश्री विमलबोधी सुरीश्वरजी महाराज यांच्या आशिर्वादाने आपणास दीक्षा घेण्याची प्रेरणा मिळाली.
त्यासाठी कोणते ज्ञान गरजेचे आहे ?जैन धर्मात दिक्षा घेण्यासाठी ज्ञान आराधना, चारित्र्य आराधना, तपश्चर्या, भक्तीसंगीत आदींचे ज्ञान आवश्यक आहे. ते शिक्षण, ज्ञान मी महाराष्ट्र, कर्नाटक, तामीळनाडू व आंधप्रदेश या राज्यातील गुरु भगवंतांसोबत तब्बल ४ हजार किलोमीटरचा पायदळ प्रवास करून मिळविले आहे.
दिक्षा घेण्यासाठी कुटूंबातून सहज होकार मिळाला काय ?होय, मी आता सज्ञान आहे; तरी देखील जैन धर्मात दिक्षा घेण्यासाठी कुटूंबातील प्रत्येक सदस्याची परवानगी घेणे बंधनकारक आहे. दिक्षा घेऊन मी जैनमुनी व्हावे, अशी आई संतोषदेवी यांची तीव्र इच्छा होती. म्हणूनच त्यांनी बालपणापासून माझ्यावर तसे संस्कार केले. सुरूवातीला आजी आजोबा, वडिलांचा दिक्षेसाठी विरोध होता; मात्र आईने पुढाकार घेवून या मंडळींचे मन वळविण्यात यश मिळविले.