अकोला : तूर उत्पादक शेतकऱ्यांना साहाय्य करण्यासाठी राज्य शासनाने तुरीसाठी बाजार हस्तक्षेप योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. या योजनेंतर्गत २२ एप्रिल २०१७ पर्यंत खरेदी केंद्रांवर आवक होऊन नोंद झालेली तूर खरेदीविना शिल्लक आहे, अशी तूर खरेदी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी निराश होऊ नये तसेच तूर खरेदीचा गैरफायदा घेणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी सांगितले. तेल्हारा येथील कृषी उत्पन्न बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात तुरीची आवक झाली आहे. साठवणुकीसाठी समितीने ३०० पोते तूर अकोला वेअर हाउसकडे पाठविले. त्यापैकी २७ पोत्यांतील तुरीची प्रत चांगली नसल्याचे कारण देत ते पोते परत तेल्हारा येथील कृषी उत्पन्न बाजारपेठेत पाठविण्यात आले. चांगल्या प्रतीच्या तुरीमध्ये खराब तूर मिसळण्याप्रकरणी संस्थेच्या व्यवस्थापकांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची पालकमंत्री यांनी गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणात कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. दोषीविरोधात कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री यांनी दिले आहेत.बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत तूर खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मर्या. मुंबई व दि. विदर्भ सहकारी पणन महासंघ मर्या. नागपूर या संस्थांची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खरेदी केंद्रांवरील खरेदीविना शिल्लक असलेल्या तुरीचा पंचनामा करण्यासाठी संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. पारदर्शक पद्धतीनेच तुरीची खरेदी केली जाणार आहे.
तूर खरेदीचा गैरफायदा; कारवाई करणार!
By admin | Published: April 28, 2017 1:57 AM