लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: ब्ल्यू व्हेल चॅलेंज हा ऑनलाइन गेम आहे. यात फिफ्टी डे डेअर म्हणजेच ५0 दिवसांत एकेक चॅलेंज स्वीकारून ते पूर्ण करीत पुढे जायचे असते. याचा शेवटचा टप्पा ‘आत्महत्या करून दाखवणे’ हा आहे. मीडिया रिपोर्टर्सनुसार, जगभरात या गेममुळे आतापर्यंत १00 हून अधिक मुलांचे बळी गेले आहेत. राज्यात काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे शासनानेसुद्धा ब्लू व्हेल गेमची मुलांमधील वाढती क्रेझ कमी करण्यासाठी पावले उचलली आहेत. या जीवघेण्यापासून विद्यार्थ्यांना परावृत्त करण्यासाठी आता शाळांमध्ये सल्लागार समित्या स्थापन करण्यात येणार आहे. ब्लू व्हेल चॅलेंज गेमचा वाढता प्रसार रोखण्यासाठी विधानसभेत चर्चा करण्यात आली.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये या जीवघेण्या खेळाविषयी आकर्षण वाढत असल्याने, त्याला प्रतिबंध करण्यासाठी शासनाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विधानसभेत झालेल्या चर्चेदरम्यान काही आमदारांनी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा यासंदर्भात शिक्षण विभागाला उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. ब्लू व्हेल गेमपासून मुलांना परावृत्त करण्यासाठी शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी १५ जानेवारी रोजी राज्यातील सर्व शिक्षणाधिकार्यांना शाळांमध्ये सल्लागार समिती स्थापन करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. शाळांमध्ये सल्लागार समिती स्थापन केल्याचे अहवाल शिक्षण आयुक्त कार्यालयास पाठविण्याससुद्धा सांगितले आहे.
सल्लागार समितीमध्ये नियुक्त कोणाला करावे?शिक्षण संचालनालयाने ब्लू व्हेल गेमचा विद्यार्थ्यांमध्ये होणारा प्रसार रोखण्याच्या दृष्टिकोनातून प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये सल्लागार समित्या स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत; परंतु या सल्लागार समित्यांमध्ये कोणत्या तज्ज्ञांना नियुक्त करावे, विद्यार्थ्यांचे समुपदेशन कसे करावे, याबाबतच्या कोणत्याही मार्गदर्शक सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे शिक्षणाधिकारी संभ्रमात आहेत.
ब्लू व्हेल गेमचा प्रसार रोखण्यासाठी आणि मुलांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी शाळांमध्ये सल्लागार समित्या नियुक्त करण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात लवकरच प्रपत्र तयार करून शाळांना समिती स्थापन करण्याच्या सूचना देण्यात येतील. प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी.