आधीच नैसर्गिक संकटाने घेरलेल्या शेतकऱ्याला सोयाबीनच्या निकृष्ठ बियाण्यांमुळे मोठे नुकसान झाले. सोयाबीन बियाण्यांच्या उगवणीबाबत कृषी विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. आगामी हंगामात असे प्रकार टाळता यावे याकरिता विभागीय कृषी सहसंचालकांसोबत कृषी विभागाची ऑनलाइन सभा पार पडली. त्यानुसार सोयाबीन बियाण्याची विक्रीपूर्व त्याची कंपनी व लॉटनिहाय उगवण क्षमता चाचणी करावी, असे पत्र वरिष्ठांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद कृषी विकास अधिकाऱ्यांनी विक्रेत्यांच्या संघटनेला दिले.
या पत्राला अकोला जिल्हा कृषी व्यावसायिक संघाने उत्तर दिले आहे. यात कंपनीनिहाय, लॉटनिहाय सोयाबीन बियाण्याची चाचणी कशी करावी, चाचणी करण्यासाठी सोयाबीन बियाण्याची बॅग एका लॉटची फोडल्यावर नंतर त्या बॅगचे काय करावे, सोयाबीन बियाण्याची फोडलेली बॅग बिलामध्ये शेतकऱ्याला विकणे हे कायद्याच्या चौकटीत बसते काय, असे प्रश्न विचारले आहेत. शिवाय एका विक्रेत्यांकडे कुठल्याही कंपनीच्या सोयाबीनच्या १०० बॅग येत असतील, तर त्या सरासरी तीन लॉट असतात. याप्रमाणे तीन लॉटच्या तीन बॅग नमुना घेण्यासाठी फोडाव्या लागतील. अशा साधारण पाच कंपन्यांचे बियाणे एका विक्रेत्याकडे येत असेल, तर १५ बॅग नमुन्यासाठी फोडाव्या लागतील.
ही परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व विक्रेते २०२१-२२ च्या या हंगामात केवळ प्रमाणित बियाणे विकणार आहोत. प्रमाणित बियाणे हे शासनाने प्रमाणित केलेले असल्याने त्याची पूर्वउगवण चाचणी करणे आवश्यक राहील काय, याबाबतही कृषी खात्याने मार्गदर्शन करावे, असे पत्रात कृषी विक्रेता संघाचे कार्याध्यक्ष मोहन सोनोने व सचिव सचिन राऊत यांनी कळविले आहे.
--बॉक्स--
तर बियाणे जाईल वाया
जिल्ह्यात ६०० कृषी विक्रेते आहेत. प्रत्येकाने १५ बॅग फोडल्या तर ९००० बॅगची एकूण चाचणी होईल. त्यामुळे एवढे बियाणे वाया जाईल. या बॅगांमुळे ९००० एकराचे बियाणे पेरणीविना राहील, असे गणित मांडले आहे.