साखरखेर्डा (जि. बुलडाणा) : मेहकर तालुक्यातील पेनटाकळी येथे बाळापूर तालुक्यातील बल्लाळी येथील ४0 वर्षीय इसमाचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला. या प्रकरणी तब्बल १७ दिवसांनी मृतदेह उकरून शवविच्छेदन करण्यात आले आहे. मृत व्यक्तीचे नाव राजू दशरथअप्पा साळुंके असून, त्याच्यावर बल्लाळी येथे दफनविधी करण्यात आला असून, या इसमाचा खून झाल्याचा संशय नातेवाइकांनी व्यक्त केला आहे.खामगाव तालुक्यातील शिराळा येथील नाथजोगी समाजाचे काही कुटुंब म्हशी पाळण्याच्या उद्देशाने तीन महिन्यांपूर्वी पेनटाकळी येथे आले आहेत. त्यापैकी प्रकाश माणिकराव शिंदे यांचा मुलगा बाजीगर याला मुलगा झाल्याची माहिती बाजीगर यांची पत्नी आरती हिचे वडील राजू दशरथआप्पा साळुंके यांना बल्लाळी येथे फोनवर कळविली. नातू झाल्याच्या आनंदात राजू साळुंके आणि त्याची पत्नी ४ एप्रिल रोजी पेनटाकळी येथे आले. त्या रात्री क्षुल्लक कारणावरून आपसात वाद होऊन हाणामारी झाल्याने त्यात राजू साळुंके याचा मृत्यू झाला. ही बाब कुणालाही माहीत न करता प्रेताला वनस्पती तूप लावून तसेच ठेवले व राजूचा मृत्यू झाल्याची माहिती प्रकाश शिंदे याने ५ एप्रिल रोजी राजूचे वडील दशरथआप्पा साळुंके यांना फोनवर कळविली. साळुंके कुटुंबीय पेनटाकळी येथे आले. तेव्हा राजूच्या अंगाला वनस्पती तूप लावलेले होते. राजूचे प्रेत पेनटाकळी येथून ७ एप्रिल रोजी अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील बल्लाळी येथे घेऊन गेले. तेथे समाजाच्या रीतिरिवाजाप्रमाणे दफनविधी करताना छातीवर धारदार शस्त्राचा वार केल्याचे छिद्र नातेवाइकांना दिसून आले. या घटनेची माहिती दशरथआप्पा साळुंके यांना कळाली. प्रथम त्यांनी चान्नी पोलीस स्टेशनला माहिती दिली.
दफनविधीच्या १७ दिवसांनंतर शवविच्छेदन
By admin | Published: May 05, 2016 2:36 AM